भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे काल कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, माझी आई सरस्वती आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच.
तसेच लिहितात, प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे. आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच. ओम शांती! असे ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरस्वती पाटील यांनी अत्यंत कष्टाने पाटील कुटुंबीयांचे पालनपोषण केले. मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांनी मेहनतीचे आणि सामाजिक जाणिवेतून इतरांना मदत करण्याचे संस्कार दिले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. चंद्रकांत पाटील यांच्या सर्व सामाजिक व राजकीय कारकिर्दीत त्या ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे वास्तव्य चंद्रकांत पाटील यांच्या नाळे कॉलनीतील बंगल्यात होते. आठवडाभरापासून त्या आजारी होत्या, काल दुपारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. ‘आई काही दिवसांपासून आजारी होती. दुपारी ती देवा घरी गेली.’ अशी पोस्ट चंद्रकांत पाटील यांच्या फेसबुक वरून पाहायला मिळाली.
माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे.
आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..
ओम शांती! pic.twitter.com/0LV6b8eQHD— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 24, 2022
त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी दादांच्या घरी गर्दी केली. काल सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली. पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.