‘अबू आझमी सारख्या माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे’; संभाजीराजेंना संताप अनावर

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब वाईट राजा नव्हता, औरंगजेबचा खरा इतिहास समोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही, असं वक्तव्य केले होते. त्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आझमींच्या या विधानावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.

आज लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती यांनी अबू आझमी यांच्यावर टीका केली. म्हणाले, आझमी महाराष्ट्रात का राहत आहेत. असल्या माणसाला पहिले महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे, असे बोलायची यांची हिंमत कशी काय होते?

तसेच म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याचे ठरवले होते. पण, असली माणसे महाराष्ट्रात राहतात हे आपलं दुर्दैव आहे, असे संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.

पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील नागरिकांनी त्यांना सांगायला हवे की तुला जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे व सगळ्या संतांचे नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतात? असही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

दरम्यान, औरंगजेब वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास समोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही, असे अबू आझमी यांनी विधान केले होते.

मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील अबू आझमी यांच्यावर टीका केली आहे. म्हणाले, औरंगजेब वाईट नव्हता त्याचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. हे बोलणारा अबू आझमी शिवरायांच्या महाराष्ट्रातून निवडून येतो. मविआ सरकारला पाठिंबा दिला म्हणून या औरंग्याच्या औलादीवर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची नवाब सेना मूग गिळून गप्प आहे का?असा सवाल त्यांनी केला.