आपल्याकडे कोणीही लहान बाळ असो, त्याला पाळण्यात झोपवलं जातं. बाळाला देखील पाळण्यात टाकताच झोप लागते. मात्र, हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला आहे. पाळण्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. यवतमाळमधील पुसद येथे विजय घुक्से हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. घुक्से कुटुंब शेतकरी आहे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. यांच्या दोन मुलांना पाळण्यामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला. यात सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची मृत झाले आहेत.
विजय घुक्से आणि पत्नी सारिका हे दोघे शेतात गाजर काढण्याचे काम करीत होते. दरम्यान, आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजसला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी 11 वाजता घुक्से यांची मोठी मुलगी प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती तिने केली. मात्र आई तेजसला झोका दे असे म्हणून पाणी आणण्यासाठी घरात गेली.
आई घरात गेली, आणि त्याच वेळी त्या दोन चिमुकल्यावर काळाने घात केला. जिथे झोका बांधला होता, त्या ठिकाणी सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब होता. तो अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर पडला. तर लहानगा तेजस हा जोरात बाजूला फेकला गेला. आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आली असता घडला प्रकार पाहून तिने आरडाओरड केली.
सारिकाचा आवाज ऐकून शेतात काम करत असलेले वडील विजय त्या ठिकाणी धावत आले. त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्राचीला पाहताच मृत घोषित केले आणि तेजसच्या उपचारासाठी त्याला नांदेड येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
मात्र वाटेतच चिमुकला तेजसनेही प्राण सोडला. या दुर्दैवी घटनेमुळे घुक्से कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोणावर काळ कसा घात करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.