Share

पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल

स्वयंपाक घरातील गॅसचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडतात. गॅस व्यवस्थित बंद न करण्याच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण मध्ये घडली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी १७ जुलै पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास पूजेसाठी उठले होते. त्यांनी अंघोळ केल्यानंतर देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लायटर पेटवला.

घरातील गॅस चालूच असल्यामुळे त्या लायटरच्या ठिणगीने लगेचच आग पकडली. संपूर्ण घरात आगेचा भडका उडाला, आणि पुढच्या काही क्षणात घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. आग एवढी भीषण होती की, परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं.

त्यानंतर स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोट झाल्याची माहिती मोरे यांच्या मुलाला आणि पोलिसांना शेजाऱ्यांनी तात्काळ दिली. या आगीत हनुमंत मोरे जवळपास ४० टक्के भाजले गेले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मुलगा आल्यानंतर मुलाने आपल्या वडिलांना उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. पहाटे झालेला हा स्फोट एवढा भीषण होता की, या स्फोटात घराचे पत्रे हवेत उडून गेले. स्वयंपाक घरातील बहुतांश सामान हे जळून खाक झाले.

या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्फोटाचं नेमकं कारण काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, प्राथमिक तपासातून पोलिसांना स्वयंपाक घरातील गॅस चालूच राहून घरात गॅस पसरला आणि लायटर पेटवताच या गॅसने आग पकडल्याचा अंदाज येत आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now