Share

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. सुभाष देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

सुभाष देशमुख यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना सुभाष देशमुख यांनी साथ न दिल्याने त्यांचा सोमवारी अखेर मृत्यू झाला आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी सुभाष देशमुख यांना मृत घोषित केलं आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, देशमुख सीसीयू विभागात उपचार घेत होते. ते ४५ टक्के भाजले होते. त्यांची गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरुन अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

घडलेली घटना म्हणजे, सुभाष भानुदास देशमुख यांनी २३ ऑगस्ट रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत त्या शेतकऱ्याला लागलेली आग विझविली. त्यानंतर पोलिसांनी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले.

शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. सुभाष भानुदास देशमुख यांनी आत्मदहन केल्यानंतर गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र, काल त्यांचा पावणे बाराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ‘शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, सरकार तुमचं आहे’ असे बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now