Share

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होताच केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती. त्यांनी आनंद दिघें यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता केदार दिघे यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुतणे केदार दिघे यांच्यावरती बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजलेली आहे. शिवसेनेला यामुळे आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यात केदार दिघेंसोबत आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे.

केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी नुकतेच ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच हा गुन्हा दाखल झाल्याने ठाण्यातलं राजकारण पुन्हा वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.

एक तरुणी लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. हॉटेलची मेंबरशीप घेण्यासाठी केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर त्या हॉटेलमध्ये गेला. सदस्य फी चा चेक घेण्यासाठी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर रोहितने बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार न करण्यासाठी दिघेंकडून धमक्या येत होत्या असे या तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी मात्र या प्रकरणात आणखी काही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नवे आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याही प्रकरणाला राजकीय रंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर केदार दिघे हे उद्धव ठाकरेंकडे उरलेला सर्वात सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेले होते. मात्र या गुन्ह्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यात फक्त गुन्हा दाखल झाला तर कोणत्याही क्षणी केदार दिघे यांच्यावरती कारवाईची शक्यता आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now