राज्य शासनात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आणि शिवसेनेतील एक मोठे नाव आता अडचणीत आले आहे. बलात्काराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
लग्नाच्या थापा देऊन एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून ज्या नेत्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते म्हणजे, शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक आहेत.
कुचिक हे शिवसेनेचा उपनेता आणि भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. तसेच, राज्याच्या किमान वेतन समितीचे अध्यक्ष आहेत. दौंड मधील 24 वर्षीय तरुणीने त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाणा, पुणे येथे तक्रार दिली आहे. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 या दरम्यान तिच्यासोबत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कुचिक यांनी त्या तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ती गरोदर राहिली. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गर्भपात केला. हा सर्व प्रकार तिच्या सोबत 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडला. पुणे, गोवा येथील विविध ठिकाणे आणि हॉटेलांमध्ये हे सर्व घडले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावर आता कुचिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे. तसेच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
तसेच म्हणाले की, माझा तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. ते या प्रकरणाचा योग्य तो तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. तसेच याबाबत खटला दाखल झाल्याने यावर मी जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम यावर काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह आम्ही सविस्तर बाजू मांडू असे कुचिक यांनी सांगितले.