आरोपीकडे खंडणी मागणं महिला पोलीस निरीक्षकाला चांगलच महागात पडलं आहे. त्यासंदर्भात तिच्यावर आणि इतर साथीदारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची देखील बदनामी होताना दिसत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील ज्या महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचे नाव शालिनी शर्मा आहे. त्यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खंडणी आणि धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे शालिनी शर्मा यांच्यासह तिघा जणांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदार आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात फिर्याद दिली होती. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअँप कॉल करून मागितल्याचा आरोप तिने केला होता.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा, एक निलंबित पोलिस अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमधील निलंबित पोलिस अधिकाऱ्याचे नाव अनिल जाधव असून, याने अन्य एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या गुन्ह्यात, निलंबित पोलिस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि त्यांचा हस्तक राजु सोनटक्के, शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपींकडे दोन लाख रुपये व्हॉट्सअँप कॉल करून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यावर आता गुन्हे शाखेने तक्रारीची शहानिशा केली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.
महिला पोलीस निरीक्षक असणाऱ्या शालिनी शर्मा नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणुकीस असतांना शाहीन बाग आंदोलन प्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याशी खटका उडाल्यावर त्यांची अनपेक्षित बदली चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तसेच त्यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं.