पृथ्वीवरून मंगळ आणि चंद्रापर्यंत धावणार बुलेट ट्रेन; जपान लागला तयारीला

अंतराळावर कब्जा मिळवण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अंतराळात सर्वात पहिल्यांदा कोणता देश विस्तार करेल, आणि कोण सर्वात प्रथम आपले पाऊल तिथे रोवल याची सध्या स्पर्धा आहे. त्यासाठी अनेक मात्तबर देश प्रयत्न करत आहेत.

कुणी चंद्रावर बेस तयार करण्याच्या विचारात आहेत. तर कुणी मंगळावर कॉलनी वसवण्याच्या विचारात आहे. यातच काजिमा कन्स्ट्रक्शनच्या मदतीने जपानमधील क्योटो विद्यापीठातील संशोधक कृत्रिम अंतराळ शहर वसवण्याच्या तयारीत आहेत.

जपान मंगळावर काचेचे अधिवास बांधण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ असा की जपान मंगळावर असे कृत्रिम अवकाश निवासस्थान बनवणार आहे, ज्याचे वातावरण पृथ्वीसारखे बनवले जाईल, जेणेकरून मानव तेथे राहू शकतील आणि मंगळाच्या वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही.

तसेच जपान एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे. याअंतर्गत जपान पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या योजनेवरही काम करत आहे. ही बुलेट ट्रेन प्रथम चंद्रावर नेण्याची जपानची योजना आहे, ही योजना यशस्वी झाल्यास मंगळावरही नेण्याची योजना आहे.

तेथील वैज्ञानिक आता केवळ अंतराळात जाण्याचा विचारच करत नाहीत, तर त्या ठिकाणी नवं जग स्थापन करण्याच्या विचारात ते दिसतायेत. हा प्रकल्प जपानच्या क्योटो विद्यापीठ आणि बांधकाम कंपनी काझिमा कॉर्पोरेशनने विकसित केला आहे.

स्पेस बुलेट ट्रेनसाठी ‘हेक्सॅगॉन स्पेस ट्रॅक सिस्टीम’ नावाची यंत्रणा विकसित करणार असल्याचे क्योटो विद्यापीठातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरप्लॅनेटरी स्पेस ट्रेन पृथ्वी, चंद्र आणि मंगळाच्या दरम्यान प्रवास करत असताना स्वतःचे गुरुत्वाकर्षण तयार करेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, हेक्सॅगॉन स्पेस ट्रॅक सिस्टीम नावाची मिनी कॅप्स्युल पृथ्वी आणि चंद्र असा प्रवास करेल. या कॅप्स्युलची त्रिज्या १५ मीटरची असेल. तर मंगळ आणि चंद्रामध्ये प्रवास करणारी कॅप्स्युल यापेक्षा मोठी असेल. पृथ्वीवर याचे स्टेशन असेल त्याला टेरा स्टेशन म्हणण्यात येईल.