आरे जंगल आहे की नाही यावरून कित्येक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातच आता आरेमध्ये मेट्रो३ साठी घातलेल्या कारशेडच्या जागेत बिबट्यांचा वावर असल्याचं समोर आलं आहे. वन विभागाने बसविलेल्या कॅमऱ्यांमध्ये आरे कारशेडच्या जागेत पाच बिबटे, तसेच आदी वन्यजीवांचा वावर असल्याचं समोर आलं आहे.
मेट्रो ३ साठी आरेमध्ये कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. असे असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याची घोषणा केली आहे.
आरे जंगल आहे की नाही, तेथे जैवविविधता आहे की नाही यावरून २०१४ पासून वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरे वन नाही अशी भूमिका अनेकदा घेतली आहे. तसेच आरे कारशेड समर्थक देखील सातत्याने आरे जंगल नसल्याचे सांगत आहेत.
मात्र, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीय आरे जंगल असल्याच्या मतावर ठाम आहेत. असे असताना कारशेड होऊ घातलेल्या आरेमधील जागेत पाच बिबटे, जंगली मांजर, सरडे, मुंगूस इत्यादी वन्यजीवांचा अधिवास आढळला आहे. त्याचा पुरावा देखील समोर आला आहे.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे वन विभागाला आरेमधील वन्यजीवांचे दस्तावेजीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरे कारशेडच्या जागेमध्ये कॅमेरा बसविण्यात आले आहेत. या संबंधीच्या अहवालानुसार नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान कारशेडच्या जागेत वन्यजीवांचा वावर असल्याचे आढळून आले.
यावर आता वनशक्ती चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले की, कारशेडमध्ये वन्यजीवांचा अधिवास आढळल्याने आरे जंगल नाही, आरे कारशेड वन क्षेत्रात मोडत नाही असा दावा करणाऱ्या राजकारण्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी ही एक चपराक आहे.