Share

Election: महाजनांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; गुलाबराव पाटलांनाही मागे पाडत अपक्षांचा गुलाल

राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून आलेला निकाल हा शिंदे आणि भाजपसाठी धक्कादायक ठरला आहे.

चोपडा तालुक्यात ११, तर यावल तालुक्यात २ अशा एकूण १३ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या ठिकाणच्या निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. इथे अपक्षांनी बाजी मारली आहे.

एकूण १३ पैकी ४ ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस ३, शिवसेना उद्धव ठाकरे गट ३, शिवसेना शिंदे गट ३ या प्रमाणे निकालात राजकीय पक्षांनी विजय मिळवला. तर भाजपचा याठिकाणी सुपडासाफ झालेला पाहायला मिळाला आहे.

चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासाठी २०१, तर सरपंच पदासाठी ७७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात माघारीनंतर सदस्य पदासाठी ९८ उमेदवार थेट रिंगणात होते, त्यात ५४ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर ४४ उमेदवारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

सरपंच पदासाठी ११ जागांसाठी ७७ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडली. तसेच यावल तालुक्यातील २ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदाच्या २४ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते, तर दोन सरपंच पदासाठी १० उमेदवार रिंगणात होते.

मतदान प्रक्रिया पार पडलेल्या या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अपक्षांनी चार जागांवर विजय मिळवत बाजी मारली आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळाला असून भाजपला मात्र एकाही जागावर विजय मिळवता आलेला नाही.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now