बँकेच्या एका चुकीमुळे २१वर्षीय तरुणी रातोरात झाली करोडपती; वर्षभरात उडवले तब्बल १८ कोटी रुपये

बँकेच्या एका चुकीमुळे महाविद्यालयीन तरुणी रातोरात करोडपती झाली. तिने ११ महिन्यांत केवळ महागड्या बॅग, कपडे आणि अपार्टमेंटवरच करोडो रुपये खर्च केले. तिच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली. ती जवळजवळ वर्षभर राजेशाही जीवन जगली.

या तरुणीचे नाव क्रिस्टीन जियाक्सिन आहे. वेस्टपॅक बँकेच्या चुकीमुळे वर्षभर राजेशाही जीवन जगली. क्रिस्टीन जियाक्सिन ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असून ती सिडनीमध्ये शिकत आहे. वेस्टपॅक बँकेने २ वर्षांपूर्वी केलेल्या एका चुकीमुळे तिच्या खात्यात £२.६ दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनात २४ कोटी रुपयांहून अधिक रुपये जमा झाले.

२१ वर्षीय क्रिस्टीन जियाक्सिनने आपल्या खात्यात एवढे पैसे पाहिल्यानंतर तिने केवळ ११ महिन्यांत, भरपूर पैसे खर्च केले. दागिने आणि कपड्यांपासून ते परिसरातील एका महागड्या पेंटहाऊसमध्ये घर बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींवर तिने हे पैसे खर्च केले.

मुलीने तिच्या महागड्या छंदांवर आणि चैनीसाठी १८ कोटींहून अधिक खर्च केले आणि सुमारे £२,५०० म्हणजेच २.३ लाख रुपये गुप्त बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले. जेव्हा बँकेला या गोष्टीचा तपास लागला, तेव्हा त्यांनी तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तरुणीचा मलेशियामध्ये राहणाऱ्या प्रियकराची माहिती मिळाल्यानंतर चौकशी टीम मलेशियात गेली. संबंधित तरुणीच्या प्रियकराची त्यांनी चौकशी केली, मात्र प्रियकराने आपल्याला क्रिस्टीन जियाक्सिन कुठे गेली याबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा केला.

क्रिस्टीन पळून गेली होती. अधिकाऱ्यांनी सर्व बाबींच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपये जमा केले, मात्र उर्वरित रक्कम त्यांना मिळाली नाही. क्रिस्टीनला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिने सांगितले, तिच्या पालकांनी तिच्या खात्यात इतके पैसे ट्रान्सफर केले असे तिला वाटले म्हणून पैसे खर्च केले.