Shivsena Shinde Group : मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार लागले भाजपच्या गळाला? राजकारणात खळबळ

Shivsena Shinde Group : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सावट जवळ येताच राजकीय वातावरण अक्षरशः उसळलं आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून, विशेषतः भाजपमध्ये (BJP) सुरु असलेली मोठ्या प्रमाणावरची ‘इनकमिंग’ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटातील (Shivsena) नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि प्रभावी चेहरे केशरी पक्षात दाखल होत असल्याने महायुतीत दडपणाचं वातावरण तयार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक दावा

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी एक मोठं विधान करून राज्यात नवा राजकीय भूकंप घडवला. त्यांच्या मते, शिंदे गटातील तब्बल बावीस आमदार भाजपकडे वळण्याच्या विचारात आहेत. या दाव्यामुळे महायुतीतील तणाव आणखी गडद झाला असून, राजकीय चर्चेला नवीन दिशा मिळाली.

फडणवीसांचा सडेतोड प्रतिकार

या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांनी कोणतीही वेळ न दवडता तीक्ष्ण उत्तर दिलं. “कोणीही उठून काहीही म्हणू शकतं. उद्या जर कोणी म्हणालं की आदित्य ठाकरे यांच्या वीस आमदारांचा भाजपशी संपर्क आहे, तर त्याला काही अर्थ असतो का?” अशा शब्दांत फडणवीसांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावला.

त्यांनी स्पष्ट केलं की शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा कोणताही विचार पक्ष नेतृत्वाकडे नाही. महायुतीत दोन्ही पक्षांचे नाते दृढ आहे आणि शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा ठाम दावा देखील त्यांनी केला. फडणवीस पुढे म्हणाले, “शिंदे सेनेचे आमदार म्हणजे आमचेच सहकारी. त्यांना भाजपमध्ये आणून काही लाभ नाही. उलट आम्ही शिंदे गट आणखी मजबूत व्हावा यासाठीच सोबत आहोत.”

शिंदे गटातील नाराजी वाढतेय?

काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील काही मंत्र्यांनी (Shinde) मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने महायुतीतील तणाव उघड झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीमुळे ‘सगळं काही ठाक आहे का?’ असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला.

दरम्यान, शिंदे गटातून भाजपमध्ये होणाऱ्या सततच्या ‘इनकमिंग’मुळे त्यांच्या संघटनेत नाराजी आणि अस्वस्थता वाढत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीचे अंतर्गत समीकरण बदलतेय का, हा प्रश्न पुढे आला आहे.

भाजपने अधिकृत पातळीवर सर्व आरोप नाकारले असले, तरी आदित्य ठाकरे यांनी केलेला दावा आणि शिंदे गटातील हालचाली यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नेमकं किती तणाव खरं आणि किती निवडणुकीपूर्वीचा राजकीय आवाज, हे प्रकरण पुढील काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.