Chandrashekhar Bawankule : मी स्टार प्रचारक, खर्चाची फिकीर तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नक्की काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule: गडचिरोलीत आयोजित भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आणि झालेल्या सभेदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अनपेक्षितरीत्या भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे (Ramesh Barsagade) यांना सार्वजनिकरित्या कानउघाडणी केली. सभेदरम्यान काही महिला कार्यकर्त्या कडक उन्हात बसलेल्या दिसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावर नाराजी व्यक्त करत बावनकुळे म्हणाले, “तुम्ही कमी बजेट म्हणता म्हणून आमच्या बहिणींना उन्हात बसवणार? मी स्टार प्रचारक आहे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका.”

“मी राज्यावर आहे… आयोगाला आम्ही हिशोब देतो” बावनकुळे मंचावरून जिल्हाध्यक्षांना उद्देशून बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, “तुम्हाला हिशोबाची भीती वाटत असेल तर गरज नाही. निवडणूक आयोगाकडे हिशोब आम्ही देणार. एक पडदा लावला तर तो ५० रुपयांचा सांगू. मी राज्यावर आहे आणि राज्यात आम्हीच खर्चाचा अहवाल सादर करू. पण लोकांना उन्हात बसवणं योग्य नाही.” त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी सभेसाठी उभारलेला अपूर्ण मंडप आणि व्यवस्थापनाचं कमी भान यावरून संपूर्ण प्रसंग चांगलाच चर्चेत आला.

यानंतर भाषणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. एका कार्यकर्त्याने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, यामागचं कारण ते सांगताना त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड केले. त्यांच्या मते, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे नाना पटोले (Nana Patole) यांचं तोंड पाहायला तयार नाहीत. नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलायला तयार नाहीत.

दोघेही मिळून सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या मतांकडे दुर्लक्ष करतात. तिघे मिळून यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्याकडे पाहत नाहीत. चौघे मिळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारत नाहीत. पाचही जण मिळून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडेही लक्ष देत नाहीत. बावनकुळे म्हणाले की, हा संपूर्ण विसंवाद पाहता काँग्रेस २०२९ पर्यंत “किंचित पार्टी” बनून राहील. त्यांच्या मते काँग्रेस पूर्णपणे नेतृत्वहीन आणि विस्कळीत झाली आहे.