Jayakumar Gore on Rohit Pawar : अकलूज (Akluj) येथे भाजपच्या (BJP) बैठकीदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी “आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी शांतपणे विचार करून झोपा,” अशा शब्दांत टीका केली.
रोहित पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेत्यांवर आरोप करत म्हटले होते की, महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे लवकरच समोर येतील. यावर प्रत्युत्तर देताना जयकुमार गोरे यांनी अकलूजमधील कार्यक्रमात थेट नाव न घेता पवार यांच्यावर पलटवार केला आणि त्यांना “अधिक बोलण्याआधी स्वतःच्या कृत्यांचा विचार करा” असा इशारा दिला.
अकलूजमध्ये भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन
अकलूज आणि सांगोला (Sangola) येथे जयकुमार गोरे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी सांगितले की, भाजपकडून उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, आणि हेच परिवर्तनाचे लक्षण आहे. अकलूजमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील (Mohite Patil) यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आणि स्थानिक पातळीवर नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, अकलूजमधील व्यापारी, डॉक्टर आणि सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता आणि व्यवसाय करता आले पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे.
बच्चू कडूंवरही टीका
यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनाही टोला लगावला. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र भाषणात सूचक टीकेचा सूर स्पष्ट जाणवत होता.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा राजकीय रंग
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, प्रचाराची तयारी आणि गटबाजीच्या चर्चांना ऊत आला आहे. जयकुमार गोरे यांच्या या विधानामुळे अकलूजच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.






