Rohit Pawar : गौतमी पाटील (Gautami Patil) प्रकरणावरील टीकेवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, BJP) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar, NCP Sharad Pawar) यांना कडक आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर ग्रामीण पश्चिम विभागात भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party, BJP) आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
गौतमी पाटील यांच्या अपघातग्रस्त गाडीच्या प्रकरणावरून रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सोशल मीडियावरून पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करत, अपघातात नसलेल्या व्यक्तीसाठी कारवाई करण्यास प्रवृत्त केल्याचा इशारा दिला होता.
रोहित पवारांवर चंद्रकांत पाटीलांचा पलटवार
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “रोहित पवार यांना काय कामधंदा आहे? स्वतःची थोडी प्रतिष्ठा राखून बोलावं. आम्हाला शिकवण्याची गरज नाही की कोणत्या प्रकरणात आम्ही काय करतो. आम्ही ढोल वाजवून काही सांगत नाही,” असे ते म्हणाले.
भाजपाने आयोजित सभेत जिल्ह्यातील सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी विधान
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोर्टातील सर्व याचिका संपल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. दिवाळीनंतर आचारसंहिताही लागू होईल. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असावा, यासाठी पक्षात एकमत आहे.
त्यांनी सांगली (Sangli, Maharashtra) जिल्ह्यात शरद लाड (Sharad Lad) भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती दिली. तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला.