Yavatmal Politics: यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गटबाजी अखेर टोकाला गेली आहे. काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवानंद पवार (Devanand Pawar) यांनी पक्षाला अलविदा केलं असून १३ सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
११ वर्षांचा वाद संपला राजीनाम्यात
माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) आणि देवानंद पवार यांच्यातील वाद मागील ११ वर्षांपासून वाढत चालला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पवार हे मोघे यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, त्यानंतर राजकारणात जितेंद्र मोघे (Jitendra Moghe) सक्रिय झाल्यावर पवार यांच्या प्रभावाला आळा बसवण्याचा प्रयत्न झाला. यातून दोन्ही गटांतील वैमनस्य उघडकीस आलं.
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांचा पराभव झाला, तर २०२४ मध्ये जितेंद्र मोघे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला पवार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना “गद्दार” अशी हेटाळणीही सहन करावी लागली. हा वाद टोकाला गेल्यानंतर अखेर पवार यांनी काँग्रेसला रामराम केला.
प्रवीण देशमुख यांचा राष्ट्रवादीकडे कल?
याचदरम्यान काँग्रेसमधील सहकार नेते प्रवीण देशमुख (Pravin Deshmukh) यांच्यावर माजी मंत्री प्रा. वसंत पुरके (Vasant Purke) यांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी मात्र आपण प्रामाणिकपणे काम केल्याचं सांगून नाराजीमुळे पुरके यांचा पराभव झाल्याचं प्रतिपादन केलं. त्यामुळे लवकरच प्रवीण देशमुख काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
शशिकांत शिंदेंची भूमिका
दरम्यान, जालना (Jalna) येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भूमिका मांडली. “आमच्याबरोबर राहिलेल्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पक्षाची उभारणी करायची आहे. विकासाचे विषय बाजूला सारून समाजात फूट पाडून राजकारण केले जात आहे. मात्र आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर संघटना उभी करू,” असे ते म्हणाले.