Walmik karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (walmik karad) याच्या कथित बोगस एन्काऊंटरसंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे. बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी व्हिडीओद्वारे दावा केला आहे की, त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी तब्बल 50 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आली होती. त्यांच्या या दाव्यामुळे बीड जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
Walmik Karad Encounter Offer
“हे पाप माझ्याकडून होणार नाही” – कासले यांचा ठाम नकार
रणजीत कासले यांनी व्हिडीओत म्हटले की, “मला सांगितले गेले की, तुला हव्या त्या विभागात बोलावून घेतले जाईल. तुला हे काम केवळ एकदाच करायचं आहे. त्यासाठी 10 कोटी, 20 कोटी, अगदी 50 कोटींपर्यंतची ऑफर देण्यात आली. पण मी स्पष्ट सांगितलं – हे पाप माझ्याकडून होणार नाही.”
बोगस एन्काऊंटर कसा घडवला जातो याचा कथित खुलासा
कासले यांनी यावेळी आरोप केला की, अशा एन्काऊंटरसाठी उच्च पातळीवर नियोजन केलं जातं. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवर गुप्त बैठक घेतली जाते. त्यानंतर पोलिसांची एक टीम तयार केली जाते. या टीमला विश्वासात घेतलं जातं आणि मोठी आर्थिक ऑफर दिली जाते. चौकशी झाली तरी सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील, अशी ग्वाही दिली जाते,” असं ते म्हणाले.
सायबर विभागात असताना मला का निवडलं गेलं?
आपल्याकडे ही ऑफर येण्यामागे कारण सांगताना कासले म्हणाले, “मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं की, हा माणूस दमदार आहे आणि हे काम करू शकतो. त्यामुळेच माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडलं गेलं.”
राजकीय पातळीवरून मोठा दबाव – एसआयटीवरही प्रश्नचिन्ह
अक्षय शिंदे प्रकरणाचा उल्लेख करत कासले म्हणाले की, “पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी स्थापन करा, अशा बातम्या पाहिल्या. पण राज्यस्तरीय एसआयटीकडून काही होणार नाही. केंद्रसरकारची एसआयटीच खरी चौकशी करू शकते.”
खळबळजनक दावे, सोशल मीडियावरून सरळ आरोप
रणजीत कासले यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक वक्तव्यांमधून पोलीस यंत्रणा आणि राजकारण्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या नव्या आरोपांमुळे राज्याच्या पोलीस प्रशासनावर आणि राजकीय यंत्रणेवर पुन्हा एकदा संशयाची सावली पडली आहे.






