नवी दिल्ली : अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाला हादरवून टाकले आहे. तीन दिवसांपासून अदानी समूह कंपन्यांमध्ये मोठी घसरण सुरू आहे. तीन दिवसांत अदानी समूहाला $65 अब्ज तोटा झाला आहे. तसेच, समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 36.1 अब्ज डॉलरची (सुमारे 29,45,72,39,00,000 रुपये) मोठी घट झाली आहे.
यासह अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर घसरले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची संपत्ती आता $84.4 अब्ज डॉलर राहिली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते.
हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात बुधवारी एका अहवालात दावा केला आहे की, अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटारडेपणाचा असून एफपीओच्या तोंडावर आमची बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांचे भाव घसरले. समूहातील 10 पैकी सात कंपन्यांचे भाव घसरले. यापैकी पाच कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटला गेले. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी 20 टक्क्यांनी घसरली.
अदानी ट्रान्समिशन 14.91 टक्के, अदानी विल्मार, अदानी पॉवर आणि एनडीटीव्ही पाच टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट्सचे शेअर्स 0.29 टक्क्यांनी घसरून बंद झाले. दुसरीकडे, समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस 4.21 टक्के, एसीसी 1.10 टक्के आणि अंबुजा सिमेंट्स मात्र 1.65 टक्क्यांनी वधारली.
अशाप्रकारे, अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये तीन दिवसांत $65 अब्ज डॉलर म्हणजेच 29% ने घट झाली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनीने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्या दिवशी समूह कंपन्यांचे भाव 10 टक्क्यांनी घसरले.
त्यानंतर शुक्रवारी अदानी समूहाच्या कंपन्यांचे भाव 20 टक्क्यांनी घसरले. सोमवारी अदानींच्या एकूण संपत्तीत $8.21 अब्ज डॉलरची घट झाली. अदानीने गेल्या वर्षी $44 अब्ज डॉलर कमावले आणि ते सर्वाधिक कमाई करणारे श्रीमंत व्यक्ती होते. परंतु या वर्षी त्यांनी $36.1 अब्ज डॉलर गमावले आहेत आणि या वर्षातील हा सर्वात मोठा तोटा आहे.
अदानी यांची आशिया आणि भारतातील क्रमांक एकची श्रीमंत खुर्ची धोक्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांना केव्हाही मागे टाकू शकतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १२व्या स्थानी आहेत.
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ८२.२ अब्ज डॉलर आहे. आता अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत फक्त २.२ बिलियन डॉलर्सचा फरक आहे. सोमवारी अंबानींची संपत्ती $809 दशलक्ष डॉलरने वाढली. तसे, या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $ 4.96 अब्ज डॉलरने घसरली आहे.
टॉप 10 मध्ये कोण आहेत
189 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क या यादीत 160 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. Amazon चे जेफ बेझोस ($124 अब्ज) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ($111 अब्ज) चौथे, महान गुंतवणूकदार वॉरेन बफेट ($107 बिलियन) पाचव्या, लॅरी एलिसन ($99.5 बिलियन) सहाव्या, लॅरी पेज ($90 बिलियन) सातव्या, स्टीव्ह बाल्मर ($86 बिलियन) आठव्या, सर्जी ब्रिन ($86.4 अब्ज) नवव्या आणि कार्लोस स्लिम ($85.7 अब्ज) दहाव्या क्रमांकावर आहेत.