Nagraj manjule and akash thosar | सध्या नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज निर्मित घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की हा चित्रपट कधी पाहायला मिळतोय. या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे यात शंका नाही.
टिझरमध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, गोळीबार दिसत होता. प्रेक्षकांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार असून येत्या ३० मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यामध्ये नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांचा समावेश आहे. हे सगळे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
नागराज मंजुळे यांनी याआधीही अनेक हिट चित्रपट दिले आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा रुळावर आणण्याचं काम नागराज मंजुळे यांनी केलं आहे. त्यांनी फॅंन्ड्री, सैराट, नाळ असे दमदार चित्रपट दिले आहेत.
त्यांच्या चित्रपटात नेहमीच काहीतरी वेगळं आणि अनन्यसाधारण पाहायला मिळतं. त्यांचे हेच वेगळेपण पाहून झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराज मंजुळे पुन्हा एकत्र येत घर बंदुक बिरयाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांचा मनोरंजनाचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या चित्रपटाबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, झी स्टुडीओजसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच वेगळा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपुर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत अनेकांनी विचारणा केली होती. आता लवकरच प्रेक्षकांना या सगळ्यांची उत्तरे मिळणार आहेत, अशी माहिती नागराज मंजुळे यांनी दिली.
दरम्यान, घर बंदूक बिरयाणी या चित्रपटासाठी प्रेक्षक सज्ज आहेत पण त्याआधी वेड चित्रपटाने लोकांना वेड लावले आहे. या चित्रपटाने सैराटचाही रेकॉर्ड मोडला आहे. एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. आता पुन्हा घर बंदूक बिरयाणीच्या माध्यमातून नागराज मंजुळे वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.