भाजपची दिल्लीतील १५ वर्षांची सत्ता उलथवत केजरीवालांनी उडवला मोदी शहांचा धुव्वा

आम आदमी पक्षाने दिल्लीची महापालिका म्हणजेच  MCD ही ताब्यात घेतली आहे. निवडणूक निकालामध्ये ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार आम आदमी पार्टीला 133, भाजपला 104 आणि काँग्रेसला 09 जागा मिळाल्या आहेत. एमसीडीमध्ये गेल्या दीड दशकांपासून सत्तेत असलेल्या भाजपचा धुव्वा उडवत आपने भाजपला मोठा दणका दिला आहे.

महापालिकेची निवडणूक असूनही ही निवडणूक हायप्रोफाईल बनली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ सातत्याने भाजपचा पराभव करत होता, पण दिल्ली महापालिकेत भाजपने दीड दशकांपासून आपली सत्ता कायम ठेवली होती. पण आपने भाजपची सत्ता उखडून टाकली.

ही निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाला संपूर्ण देशाला हा संदेश द्यायचा होता की भाजपचा विजयरथ कोणी रोखू शकत असेल तर ते फक्त केजरीवाल आहेत. यात ते यशस्वी होताना दिसत आहे. अपेक्षेप्रमाणे निवडणूक निकालात ‘आप’ला क्लीन स्वीप मिळालेला नसला, तरी भाजप आणि ‘आप’मधील जागांचे अंतर खूप आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसला भरीव कामगिरी करता आलेली नाही.

ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती, पक्षाने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. पण भाजपने उपस्थित केलेल्या मुद्द्यांपेक्षा केजरीवारांनी उपस्थित केलेल्या कचऱ्याच्या मुद्द्याने सगळ्यांनाच मात दिल्याचे दिसते.

दिल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याचे तीन डोंगर उभे आहेत, मात्र आजपर्यंत तो निवडणुकीचा मुद्दा बनला नाही. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी या तीन कचऱ्याच्या डोंगरांचा मुद्दा उपस्थित करून भाजपला चांगलेच अडचणीत आणले.

ही निवडणूक या अर्थानेही विशेष आहे की, एकत्रीकरणानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीतील तीन महापालिकांचे पुन्हा एकत्रीकरण केले होते. एकत्रीकरणानंतर दिल्लीतील वॉर्डांची संख्या 250 झाली होती.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे जाणार? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
politics : उद्धव ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला देणार धडक; मातोश्रीवर ठरला ‘हा’ प्लॅन
arvind kejriwal : नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीने उडाली खळबळ