शिखर धवनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. युवा खेळाडूंनी सजलेली टीम इंडिया यजमानांसमोर पूर्णपणे हतबल दिसली. विशेषत: अनुभवी गोलंदाजी नसल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला आहे.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने किवी संघासमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथमच्या शतकी खेळीमुळे 7 विकेट्स आणि 17 चेंडू शिल्लक असताना सहज साध्य केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सलामी जोडी शुभमन गिल (50) आणि शिखर धवन (72) यांनी पॉवरप्लेमध्ये सावध फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी 10 षटकांत 40 धावा केल्या, प्रत्येक षटकात 4 धावांच्या सरासरीने धावा केल्या.
पण नजर सेट झाल्यावर शुभमन गिलने आकर्षक फटके मारायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला शिखरनेही धावांचा वेग वाढवण्यास सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 124 धावांची मोठी भागीदारी झाली. 24व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गिल बाद झाला. त्याचवेळी शिखरही पुढच्या चेंडूंमध्येच बाद झाला.
लागोपाठ 2 विकेट पडल्यानंतर भारताचा डाव रुळावरून घसरलेला दिसत होता. चांगल्या सुरुवातीनंतर ऋषभ पंत (15) पुन्हा एकदा लवकर बाद झाला, तर सूर्यकुमार यादवही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर एका टोकाकडून या सर्व विकेट पडताना पाहत होता. 160 च्या धावसंख्येवर भारताने 4 प्रमुख फलंदाज गमावले होते. या कठीण परिस्थितीत संजू सॅमसनने (35) श्रेयसला साथ दिली.
दोन्ही फलंदाजांमध्ये 94 धावांची भागीदारी झाली. ज्याने भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले होते. अय्यरने शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करत शानदार 80 धावा केल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरच्या 16 चेंडूत 37 धावांच्या तुफानी खेळीमुळे टीम इंडियाने 306 धावा केल्या.
307 धावांचे लक्ष्य निश्चितच एकदिवसीय सामन्यात आव्हानात्मक आहे. मात्र अनुभवा अभावी भारतीय गोलंदाजांना आत्मविश्वास मिळत नव्हता. मात्र शार्दुल ठाकूरने सुरुवातीच्या स्पेलमध्ये शानदार गोलंदाजी करत धडाकेबाज फलंदाज फिन अॅलनला बाद केले.
यानंतर उमरान मलिकने १६व्या षटकात डेव्हॉन कॉनवेला पायचीत केले. यावेळी किवी संघाने 68 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. 20 षटकांत उमरानने डॅरिल मिशेलला बाद करत सामन्यावर भारताची पकड पूर्णपणे मजबूत केली. ODI मध्ये डेब्यू विकेट घेतल्यानंतर उमरान मलिकने गिल-सूर्याला मिठी मारून खास पद्धतीने आनंद साजरा केला.
सातत्याने विकेट पडताना केन विल्यमसन एका टोकाला उभा राहिला, नंतर अनुभवी टॉम लॅथमने त्याला साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी 149 धावांची भागीदारी केली, टॉमने 145* धावा केल्या. तर केननेही ९४* धावांचे योगदान देत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
भारताकडून या सामन्यात उमरान मलिकने सर्वाधिक विकेट घेतल्या, याशिवाय कोणताही गोलंदाज प्रभावी ठरू शकला नाही. त्यामुळे पहील्या विजयाची नोंद करून यजमानांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.