नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांवर दुर्दैवी वेळ ओढावल्याची घटना घडली आहे. एका नवजात बाळाचा मृतदेह वडिलांनी अक्षरशः बाईकच्या डिक्कीत ठेवून थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठल्याचं समोर आलं आहे. सध्या या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
संबंधित घटना ही मध्यप्रदेश मध्ये घडली आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये राहणारे दिनेश भारती यांची पत्नी गरोदर होती. तिला प्रसुती कळा येऊ लागल्याने ते १७ ऑक्टोबरला आपल्या पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचले. मध्य प्रदेशच्या सिंगरौली येथील जिल्हा रुग्णालयात पत्नीसह ते आले.
तिथे असलेल्या डॉक्टरांनी चाचण्या करण्यासाठी पत्नीला एका क्लिनिकमध्ये पाठवलं. तिथे त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले गेले. चाचण्या करुन दिनेश पुन्हा जिल्हा रुग्णालयात पत्नीला घेऊन आले. तिथे पत्नीने मृत बाळाला जन्म दिला.
या दुःखातून सावरण्याची मानसिक तयारी करायची होती. पत्नीला सांभाळायचं होतं. पण त्यात रुग्णालय प्रशासनाच्या अमानवी कृतीचा सामनाही दिनेश यांना करावा लागला. पत्नी आणि मृत बाळाला घेऊन जाण्यासाठी दिनेश यांनी रुग्णवाहिका मिळावी, अशी विनंती केली.
पण रुग्णालय प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या दिनेश यांना काय करावं, हे सुचेनासं झालं होतं. ते प्रचंड संतापले होते. अखेर दिनेश यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत नवजात बाळाचं शव ठेवलं.
त्यानंतर त्यांनी या नवजात बाळाला डिक्कीत ठेवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. गाडीच्या डिक्कीतून आणलेला नवजात बाळाचा मृतदेह त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर काढला. हे थरारक दृश्य पाहून संपूर्ण जिल्ह्याधिकारी कार्यालय हादरून गेलं.