दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. यासाठी अनेकांची दिवाळीच्या खरेदीसाठी लगभग सुरू आहे. पुण्यात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाहेर पडायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो.
अशावेळी ज्याला त्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा नियम मोडणाऱ्यांना चक्क दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना कसलाही दंड अथवा शिक्षा होणार नाही, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत त्यांनी पोलिसांनाही निर्देश दिले की, चलन फाडण्यात वेळ घालवू नका, नियम मोडणाऱ्यांना बाजूला घेऊन समज द्या. आता पाटील यांच्या निर्देशांमुळे वाहतूक समस्या सुटणार की वाढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांवर दिवाळी आली आहे, त्यात काल शेवटचा रविवार असल्याने नागरिकांची खरेदीसाठी पुण्यात गर्दी दिसली. तुळशीबाग, तसेच बेलबाग चौक ते मंडईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यात फेरीवाल्यांसोबतच बाहेरच्या परप्रांतीय फेरीवाल्यांचेही आगमन झाले आहे, त्यामुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अशा परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकर देखील यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यात आता चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशांमुळे वाहतूक कोंडी आणखी वाढणार का पाहावे लागेल.