uddhav thackeray : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. पक्षाला गळती लागल्याचे पाहायला मिळाले. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. धक्कादायक बाब म्हणजे, आता थेट ठाकरे कुटुंबात देखील शिंदेंच्या बंडाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतं आहे.
हे सांगण्याच कारण म्हणजे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या मुलाने म्हणजेच बाळासाहेबांचे नातू जयदीप ठाकरे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहत शिंदेंना पाठिंबा दिला होता.
बुधवारी बीकेसी येथील मैदानावर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांच्या स्टेजवर उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे हे दोघेही उपस्थित होते. यावेळी जयदेव ठाकरे यांनी शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं.
तर त्यानंतर आता त्यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय..? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातं आहे. याचबरोबर यामुळे ठाकरे पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, ‘मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडली. भविष्यात जर आपल्यावर शिवसेनेनं जबाबदारी दिली, तर ती पार पाडण्यासाठी निश्चितच काम करेन, असंही जयदीप ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
पुढे बोलताना जयदीप ठाकरेंनी सांगितलं आहे की, ‘रश्मी काकी आणि माजी मंत्री आदित्य यांच्याशी मी बोलत असतो. दसरा मेळाव्याच्या दिवशीही आम्ही बोललो. उद्धव काकांनाही भेटलो. त्यांना मला व्यवस्थित भेटायचं आहेच. त्यांची वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटेन.’