Sharad pawar : ‘मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या आणि दाऊदचा…’;शिंदे गटाच्या मेळाव्यात शरद पवारांवर टीकास्त्र

मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या भाषणात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

शहाजीबापू पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. म्हणाले, बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे?असं विचारत उपस्थित प्रेक्षकांना शरद पवारांचं नाव मोठ्याने घेण्यास शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं.

तसेच म्हणाले, ‘गुलाबराव मी काँग्रेसमध्ये होतो. तरीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची दसरा मेळाव्याची सभा टीव्हीवर कायम ऐकायचो. तुम्हीही ऐकत असाल. हिंदुहृदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणाले?शरद पवार…मोठ्याने नाव घ्या घाबरू नका.’

पुढे म्हणाले, ‘बारामतीचा म्हमद्या कोणाला म्हणाले? शरद पवार..दाऊदचा हस्तक कोणाला म्हणाले? शरद पवार…ही इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, कोण म्हणाले, तर हिंदुहृदयसम्राट म्हणाले’ असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांची खिल्ली उडवली.

दरम्यान, यावेळी भाषणात शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. म्हणाले, माझ्या मनात एक इच्छा आहे. तुमच्याकडे कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन हे बघून जा म्हणावं. मग खरी शिवसेना कुठली हे कळेल, असं विधान पाटलांनी केलं.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटावर टीका केली. म्हणाले, ‘शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. ही बाप चोरणारी औलाद आहे. शिवसेनेशी गद्दारी केली. मंत्रिपद काही काळासाठी आहे. पण गद्दार हा शिक्का कायमस्वरूपी आहे.’ असे ठाकरे म्हणाले.