आज शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. आपल्या मेळाव्यात अधिक गर्दी व्हावी यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाची चढाओढ सुरू आहे. त्यातच आता दसरा मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून पैशांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना औरंगाबादमधून ५०० गाड्या शिंदे गटाच्या वतीने सोडण्यात आल्या असून २५ हजार लोकंही शिंदे त्यांच्यासोबत गेले असल्याचं सांगितलं. यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत असताना शिंदे गटावर मोठा आरोप केला.
चंद्रकांत खैरे म्हणाले, त्यांचं काही मला विचारू नका..ते गद्दार आहेत, गद्दारांशी कशी बरोबरी करायची? प्रत्येकाला १ हजार रुपये दिलेत त्यांनी. ५२कोटी रुपये त्यांनी खर्च केलेत. हा आकडा जास्तही असू शकतो. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हे पाप गद्दार करत आहेत असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
तसेच म्हणाले, शिंदेंच्या मेळाव्याला ३ लाख येऊ दे, नाहीतर ५ लाख येऊ दे..ते पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. उद्धव ठाकरे या सगळयांचा नक्कीच समाचार घेतील. लोकांची श्रद्धा बाळासाहेबांवर आणि त्यांच्या चिरंजीवावर आहे, असे खैरे म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सांगितले. म्हणाले, अनेक वर्ष आम्ही दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जातो आहे. आजही जाणार आहोत. कोणतंही विघ्न न येता मेळावा यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना आम्ही देवीजवळ केली असे खैरे म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाने लोकांना मेळाव्याला आणण्यासाठी तब्बल १८०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कोणाच्या मेळाव्यात अधिक गर्दी होईल पाहावं लागेल.