एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारची स्थापना झाली. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जात आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेचा गैरवापर करतात असा आरोप वारंवार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून होत आहे. असे असताना आता शिंदे गटातील नेत्याने देखील सत्तेचा गैरवापर होत असल्याचं मान्य केलं आहे.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. एसटी, बस, गाड्या मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आल्या आहेत. त्यातच या गाड्यांना जाण्यासाठी समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा समृद्धी महामार्ग उद्घाटनाआधीच खुला करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाआधीच शिंदे गटाने महामार्ग त्यांच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खुला केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुन खोतकर म्हणाले, वाहतूक कोंडी होऊ नाही म्हणून समृद्धी महामार्ग खुला करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे . तसेच म्हणाले, उद्घाटनाआधीच गाड्या समृद्धी महामार्गावरून नेण्याची आपली चूक आहे, हे देखील त्यांनी मान्य केलं.
दरम्यान, अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला आहे. तो याच समृद्धी महामार्गवरुन रवाना झाला. म्हणजे जालना ते वैजापूरपर्यंत हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. जालना ते वैजापूर १०० किमी अंतर आहे, पण हा मार्ग खास राजकारण्यांसाठी खुला करण्यात आला आहे.