मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी नुकतीच प्रसारित झाली होती. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली होती. मात्र आता या बातमीसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट नव्हताच का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्ल्याचा कट असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका तरुणाला आता अटक करण्यात आली आहे.
अविनाश वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणावळा पोलिसांनी अविनाश वाघमारेला अटक केली आहे. दारूच्या नशेत असताना वाघमारे याचे हॉटेल मालकाशी भांडण झाले. यामुळे वाघमारेने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.
वाघमारे हा मुळचा सांगलीतील आटपाडीचा रहिवासी आहे. मुंबईला जात असताना तो एका ढाब्यावर थांबला होता. यावेळी पाण्याच्या बाटलीवरुन त्याचे हॉटेल मालकाशी भांडण झाले. या भांडणानंतर त्याने थेट पोलिस कंट्रोल रुमला खोटा फोन करुन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केली.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली, असे त्याने सांगितले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
एवढेच नाही तर तपास यंत्रणा देखील कामाला लागल्या. मात्र या घटनेचा तपास करताना पोलिसांना समजले की, ही बातमी खोटी आहे. त्यांनी संबंधित खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने मुख्यमंत्र्याच्या जीवाला धोका आहे हे खोटे सांगितले, याची कबुली दिली आहे.