तब्बल दीड महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
नियोजन मंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. यात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, आणि गडचिरोली अशा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री फडणवीस असतील. तर शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराचे आणि कोल्हापूरचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.
माहितीनुसार, भाजपकडे २१जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलं आहे. भाजपकडे ज्या २१ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आलं आहे, तर शिंदे गटाकडे १५ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आलं आहे.
यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना कोणत्याही जिल्ह्याचे जबाबदारी देण्यात आली नाही. तसेच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही यात स्थान देण्यात आलं नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी टोला लगावला आहे.
https://twitter.com/ravikantvarpe/status/1573902662390599681?t=pr8O3Vwp70LN_AVLQXRN2g&s=19
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना खोचक टोला लगावला आहे. म्हणाले, ‘संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या, तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन…५० खोके! एकदम ओके!!’असे त्यांनी ट्विट केले आहे.
रविकांत वरपे यांच्या ट्विटनंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रविकांत वरपे यांनी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यावर टोला लगावल्यानंतर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार पाहावं लागेल. तसेच संजय शिरसाट आणि बच्चू कडू देखील यावर काय स्पष्टीकरण देतील पाहावं लागेल.






