शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे, परंतु अजूनही कुणालाच महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही.
त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई मनपाच्या जी-उत्तर कार्यालयात धडक दिली. महिना उलटला तरी अजूनही परवानगी का दिली जात नाही? असा थेट प्रश्न शिवसेनेकडून पालिका अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मिलिंद वैद्य म्हणाले, २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे पहिल्यांदा अर्ज करण्यात आला होता, त्यानंतर आज २० सप्टेंबर आहे. एवढ्या कालावधीत दोन वेळा पत्र आणि तीन वेळा प्रत्यक्ष भेट आम्ही विभाग अधिकाऱ्यांची घेतली.
तसेच म्हणाले, गेल्या १६ तारखेला आम्ही भेट घेतल्यानंतर परवानगीबाबत त्यांनी विधीखात्याचं मत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. पण या प्रशासनावर आमचा काडीचा विश्वास नाही. याबाबत तुम्ही कोणत्या पद्धतीनं पत्रव्यवहार केला याचा आम्हाला लेखी तपशील द्या, अशी मागणी आम्ही केली होती.
आत्ता त्यांनी याबाबत लेखी पत्र आम्हाला दिलं आहे, पण विधी खात्याकडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्यानं आम्हाला तुम्हाला उत्तर देता येणार नाही, असे मिलिंद वैद्य म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न केला.
यावर, मिलिंद वैद्य म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो अथवा ना मिळो पण उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार. तसेच आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.