सध्या ठाकरे आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. त्यांची एकमेकांवर टीका करण्याची पातळी दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. असे असताना आता शिवसेनेने शिंदे गटासोबतच भाजपला देखील लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरले आहेत. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात ते शनिवारी बोलत होते. त्यांनी केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ#$%*@#^ करणाऱ्या ४० शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागेल.
दुसरीकडे वेदांतला गुजरातमध्ये पाठवण्याचे काम शिंदे सरकार यांनी केल्याचा आरोप पुन्हा एकदा विनायक राऊत यांनी केला आहे. यावरून विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला मारला. म्हणाले, देवेंद्र फडणवीस सारख्या हुशार आणि अभ्यासू माणसावर दुर्दैवाने वाईट दिवस आले.
तसेच म्हणाले, त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. त्यामुळेच फडणवीसांना या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतं. शिंदेच्या हाताखाली काम करण्याची नामु्ष्की फडणवीसांवर आली आहे, असे विनायक राऊत यावेळी म्हटले आहे.
तसेच म्हणाले, गद्दारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम मागाठाणे येथून केले जाणार आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली. गद्दारांना गाडण्याचा दिवस आला आहे, असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.