‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमातील आवडते कलाकार समीर चौघुले त्यांच्या अभिनयाने घराघरात पोहोचले आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यात आता ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा देखील समावेश झाला आहे.
मोहनदास सुखटणकर यांनी समीर यांना चक्क फोन करून बोलवून घेतलं. त्यानंतर समीर चौघुले यांनी मोहनदास सुखटणकर यांची भेट घेतली, आणि भेटीदरम्यानचा त्यांचा भारावून टाकणारा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
समीर चौघुले यांनी लिहिले की, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. ९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होतं.
मोहनकाका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनीवरील संभाषणात सांगितले होते. भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता, मला आता मिळाला.
तसेच मोहनदास सुखटणकर यांचा भेटीच्या आधी आलेल्या फोनबद्दल सांगताना समीर लिहितात. पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला,’समीर, अरे ९३ वर्षांचा आहे रे मी. तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे. पण शक्य होत नाही रे,’ यावर कुठेतरी आत चर्र झालं.
गेले काही महिने थोडा वेळही काढता न यावा इतकंही मोठं काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली. स्वतःचाच राग आला आणि त्याच दिवशी मी मोहन काकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो. मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली.
त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती. मलाही क्षणभर भरून आलं. त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. मी वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी सुरकुत्या पडलेल्या हातांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.
आमच्या गप्पा सुरु झाल्या, मोहनदास सुखटणकर म्हणाले,तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन. तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी “वपु” ”विंदा”बसून गेले आहेत.
मी हे ऐकून भारावून गेलो. पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो. फोनवर त्यांचा ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता. एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता, असे समीर चौघुले यांनी लिहिले.