काल श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दत्तात्रेय गावडे यांच्या महेश्वर मल्टीस्टेटच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित भाजप नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतूक केले.
बबनराव पाचपुते म्हणाले, पावसामुळे आज साहेब येणार की नाही याबद्दल शंका होती. मात्र साहेब हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. त्यांचे काम सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे झालेल्या विकासकामांची यादी वाचायला वेळ पुरणार नाही, एवढे त्यांचे मोठे काम आहे.
आपल्या आजारापणावर बोलताना पाचपुते म्हणाले, मला आजाराने गाठल्यावर डाॅक्टर म्हणाले पवार साहेबांकडे पहा ते आजाराला कधीच घाबरले नाहीत, तुम्हीही तसेच निर्धास्त रहा. डाॅक्टरांचे साहेबांबद्दलचे बोल ऐकले आणि लगेच उर्जा आली, असे पाचपुते म्हणाले.
तसेच म्हणाले, शरद पवार यांचे नाव ऐकले तरी ऊर्जा येते. महाराष्ट्र व देशाला घडविणारा नेता अशी त्यांची ख्याती असून कृषीमंत्री असताना त्यांनी केलेले काम नेता कसा असावा, हे दाखविण्यासाठी पुरसे आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवारांचे कौतूक केले.
दरम्यान, बबनराव पाचपुते यांनी केलेली पवारांची स्तुती ही भाजप नेते नारायण राणे यांच्यासाठी एक चपराक म्हणावी लागेल. कारण, गुरुवारीच नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनेक सवाल त्यांनी शरद पवार यांच्या कामावर उपस्थित केले होते.
नारायण राणे म्हणाले होते, अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हतं, म्हणून इथून उद्योग गेले आहेत. उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. एवढ्या काळात औद्योगिक क्रांती झाली असती. पण ती का नाही झाली? असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता.