मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या गटाला बळ मिळावे यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील इतर विभागातही शिंदे यांनी दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमध्ये शिंदे गटाची हवा दाखवण्यासाठी, सभेत गर्दी दिसावी यासाठी शिंदे गटाने एक नवीन फंडा आणला असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण येथे सभा घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यांमध्ये आयोजित सभेत गर्दीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पैठणमधून समोर आलं आहे.
बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण दौऱ्यावेळी ४२ गावातील अंगणवाड्या सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांना १२ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पैठणच्या कावसानकर स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत.
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या या पत्राने मोठा गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली होती. त्यावेळी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला देखील मोठी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, प्रशासनानं काढलेल्या या अजब आदेशावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. म्हणाले, हा प्रकार म्हणजे अमक्याचे लग्न अन तमकेच वऱ्हाडी असा आहे. गतवेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता.
https://twitter.com/iambadasdanve/status/1568628490723008512?t=nkqVEJUGLoM952KwcSXODw&s=19
मात्र आता तशी फजिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नको म्हणून चक्क तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत. असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही. या सभेला येणाऱ्या इतर लोकांसाठी विशेष ‘रोख पॅकेज’ची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप देखील दानवेंनी केला आहे.