तब्बल ३० वर्षांपासून सुरू असलेल्या पंजाबमधील एका संपत्तीच्या वादावर अखेर सुप्रीम कोर्टाने काल पडदा टाकला आहे. हा वाद फरीदकोटचे महाराजा सर हरिंदर सिंह बराड यांच्या घराण्यातील संपत्तीचा होता. ३० वर्षांपासून हे भांडण सुप्रीम कोर्टात चालू होतं.
अखेर काल त्याचा निकाल लागला आहे. ही संपत्तीही थोडी नव्हती. आज तिची किंमत २० ते २५ हजार कोटींपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही सर्व संपत्ती राजाच्या मुलींना देण्यात यावी, असा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर ही संपत्ती राजाच्या मुलींना मिळेल. पण यापूर्वी ती महारावल खेवाजी ट्रस्टकडे होती. तेच संपत्तीची देखभाल करत होते. महारावल खेवाजी ट्रस्टने एका वारसा प्रमाणपत्राच्या आधारे या संपत्तीवर दावा ठोकला होता. मात्र, २०१३ मध्ये चंदिगड जिल्हा न्यायालयाने हे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. ही संपत्ती मुलींना देण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. तेथेही २०२० मध्ये जिल्हा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला गेला. तर मुलींसोबत त्यांच्या भावाच्या कुटुंबानाही काही भाग देण्याचं कोर्टानं म्हटलं होतं. अखेर काल हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एवढ्या दिवसांचा वाद मिटला.
ज्या संपत्तीवरून वाद सुरू होता, ती संपत्ती पाहून डोळे फिरतील. यात अनेक किल्ले, महालांसारख्या इमारती, शेकडो एकर जमीन. जुन्या कार. एक मोठं बँकेचं अकाउंट आहे. फरीदकोटमध्ये १४ एकरांतला राजमहाल, १० एकरांतला किला मुबारक आहे.
तसेच, नवी दिल्लीचे फरीदकोट हाऊस ज्याची सध्याची किंमत अंदाजे १२०० कोटी , चंदिगडचा मनिमाजरा फोर्ट चार एकर शिमल्याचे फरीदकोट हाऊस २६० बिघा बंगला, १८विंटेज कार यात रोल रॉयस, बेंटले, जॅग्वार आदींचा समावेश, १००० कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आदी संपत्ती आहे. एवढ्या मोठ्या संपत्तीचा निर्णय काल झाला.