काल बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने आणि महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांनी रविभवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांच्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल बसपा करणार असे ते म्हणाले आहेत.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने आणि महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना पत्रकार परिषदेत म्हणाले, नागपूरसह राज्यात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्याची पोलखोल आता लवकरच करणार असून, सुरुवात नागपुरातून होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
संदीप ताजने म्हणाले, नागपूर महापालिकेत दोन दशकापासून भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री भाजपचे होते, आताही भाजपचे उपमुख्यमंत्री आहे, तरी नागपूरला भकास केले आहे. विकासाच्या नावावर नुसता पैसा खर्च केल्याचे दिसून येते. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल.
प्रत्येक वार्डात कार्यक्रम होतील. राजकीय नेत्यांवर आरोप होत राहतात, माझ्यावरही झाले. पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी आरोप केले, ते आता कुठे आहेत, असा टोला संदीप ताजने यांनी दिला. तसेच म्हणाले, राज्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार होत आहेत. आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी काँग्रेसने काम केले, तर आरक्षण लागू होऊच नये, यासाठी भाजपचा जन्म झाला आहे, अशी टीकाही ताजने यांनी केली.
संदीप ताजने यांनी येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बसपाची रणनीती सांगितली. म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीची पूर्ण तयारी पक्षाने केली असून सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात येतील. जास्तीत जास्त ठिकाणी महापौर देण्याचा प्रयत्न राहील. ही निवडणूक स्वबळावर पक्ष लढवणार आहे.
दोन, तीन पक्षांनी संपर्क साधला असून त्याची माहिती सुप्रिमो मायावती यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून पुढील निर्णय घेण्यात येईल. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी १०० प्रशिक्षित कार्यकर्ते नागपुरात तळ ठोकून राहणार असून कॅडर कॅम्प घेण्यात येणार असल्याचे ताजने यांनी सांगितले.