एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी केली, आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. बहुसंख्य आमदार, खासदार शिंदे गटात जाऊ लागले. ही गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार नेले आणि सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर शिवसेना पूर्णपणे खिळखिळी झाली असून शिवसेनेकडून शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत असताना आता शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि विद्यमान सरकारचे रोहयो मंत्री आमदार संदीपान भुमरे यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा दावा केला आहे.
नव्या सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेशी निष्ठावंत असलेले आमदारही शिंदे गटाच्या गळाला लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान ईडीची भिती दाखवून आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्याचबरोबर जे आमदार किंवा नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यांच्यामागील ईडी चौकशीचा ससेमिरा कमी झाल्याचं चित्र असून भुमरे यांनी दावा केलेले दोन आमदार कोण आहेत हे पहावे लागणार आहे.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संदीपान भुमरे हे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले होते. संदीपान भुमरे यांच्या आयोजित कार्यक्रमाला मोठी गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
मोठी गर्दी जमेल या आशेने भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे जोरदार नियोजन केले होते. मात्र, कार्यक्रमाची वेळ झाली तरी कार्यकर्ते आणि लोकं या कार्यक्रमाकडे फिरकत नव्हते. कार्यक्रमाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असल्याने निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या या रिकाम्याच होत्या. त्यामुळे, सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता सुरु करण्यात आला होता.