धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी करण्यासाठी रविवारी भाजप नेते निलेश राणे रत्नागिरीत गेले असताना त्यांना तेथील स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची घटना घडली आहे. लोकांनी निलेश राणे यांच्या गाड्यांचा खूप वेळ ताफा अडवून धरला होता.
रविवारी धोपेश्वर रिफायनरीच्या पाहणीसाठी निलेश राणे रत्नागिरीत गेले असताना, बारसू गावातील लोकांनी रस्त्यामध्ये ठिय्या देत निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून धरला होता. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गावकरी एवढे संतापले होते की, निलेश राणे यांनी जाहीर माफी मागत या गावकऱ्यांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तुम्ही ठरवाल ती जागा आणि सांगाल त्यावेळी मी चर्चेला येण्यास तयार आहे. हा वाद चिघळून देऊ नका, चर्चा करूनच मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन निलेश राणे यांनी ग्रामस्थांना केले.
दरम्यान, रविवारी सकाळी निलेश राणे यांनी धोपेश्वर रिफायनरीच्या जागेची पाहणी केली. तेव्हा निलेश राणे यांनी प्रकल्पाचे समर्थन केले. काही मोजक्या लोकांचा अपवाद वगळता येथील बहुतांश जमीन मालकांना हा प्रकल्प व्हावा असे वाटते. त्यामुळे कोणीही उगाच विरोधाला विरोध करु नये, असेही निलेश राणे यांनी म्हटले होते.
त्यानंतर, निलेश राणे हे परतत असताना बारसू गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून धरला. यावेळी ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या महिलांनी निलेश राणे यांना आक्रमकपणे अनेक सवाल विचारले.
निलेश राणे यांनी एका ग्रामस्थाला शिवीगाळ करण्याची बातमी पसरल्याने ग्रामस्थ अधिकच संतापले. अशावेळी, निलेश राणे म्हणाले, हा प्रकल्प माझा खासगी प्रकल्प नाही, तर सरकारचा आहे. तुम्ही सरकारशी चर्चाच केली नाही तर या सगळ्यातून मार्ग कसा निघणार, असा सवाल निलेश राणे यांनी ग्रामस्थांना केला.
निलेश राणे यांनी केलेल्या या विधानानंतर ग्रामस्थांचे फारसे समाधान झाले नव्हते. ग्रामस्थांनी आक्रमक होऊन आपली भूमिका स्पष्ट मांडली. म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही, अशी भूमिका बारसूच्या ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर निलेश राणेंच्या गाडीच्या ताफ्याला वाट करून दिली.