Share

Story: ‘त्या’ एका क्षणाने आयुष्य उद्धवस्त झालं; वाचा दहीहंडीच्या पाचव्या थरावरून कोसळलेल्या तरूणाची कहाणी

govinda

कहाणी (Story): नटखट बाळकृष्णाचा जन्मोत्सव सगळीकडे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गुरुवारी (ता. १८) कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज (ता.१९) दहीहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्यात येईल. दहीहंडीचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्टला विधानसभेत केली.

सरकारकडून गोविंदांना शासनसेवेत पाच टक्के आरक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. प्रो- गोविंदा स्पर्धा भरवण्याचा निर्णयसुद्धा सरकारने घेतला आहे. या स्पर्धेत बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. बहुतेक वेळा सुरक्षेच्या नियमाचे पालन न केल्याने दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. एका दिवसाच्या या खेळामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसत.

शुक्रवारी (19 ऑगस्ट) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने, तेरा वर्षांपूर्वी पाचव्या थरावरून पडून जखमी झालेल्या गोविंदाची कहाणी जाणून घेणार आहोत ज्याच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य उध्वस्त झालं. या गोविंदाचे नाव नागेश भोईर आहे. त्याने स्वतःच ही कहाणी सांगितली आहे…

दहीहंडीच्या उत्सवात मला लहानपणापासून सहभागी व्हायला आवडायचं. भिवंडीतील तरुणांनी एकत्र येऊन जय महाराष्ट्र हे गोविंदा पथक सुरू केलं होतं. मी त्याच 130 जणांच्या पथकाचा भाग होतो. दंहीहंडीचा उत्सव जवळ आला की, आम्ही काही दिवसापूर्वीच रात्रीच्या वेळेस भिवंडीतल्या गौरीपाड्यातच सराव करायचो. गरज पडेल तसं मी तळापासून वरपर्यंत सर्व थरांमध्ये असायचो. वजनाने हलका असल्यामुळे अनेकदा सर्वांत वरच्या थरावर चढायचो.

2009 च्या दहीहंडी उत्सवात आम्ही दिवसभरात सात ते आठ हंड्या फोडल्या होत्या. टिळक चौकातली दहीहंडी फोडतानाही सर्व मुलं उत्साहात होती. थरावर थर लागत गेले आणि मी सर्वांत वरच्या चौथ्या थरावर चढून पाचवा थर रचला. दहीहंडी फोडली आणि अचानक दहीहंडी बांधलेली दोरी तुटली. मला काही कळलेच नाही. मी दोरीसकट खाली आलो आणि बाहेर फेकला गेलो.

एक क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झाले
14 ऑगस्ट 2009 हा दिवस माझ्या आयुष्यातला कायम लक्षात राहणारा दिवस ठरला. त्या दिवशी मी माझं अस्तित्त्व गमावून बसलो. मी तेव्हा 22 वर्षांचा होतो. भिवंडीतल्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकातर्फे दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून खाली पडलो. गंभीर जखमी झालो. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या छातीपासून शरीराच्या खालच्या भागात काहीच हालचाल नाहीत.

हात हलवू शकतो पण हाताची बोटं कडक झाली आहेत. पडलो नसतो तर आयुष्य वेगळं असतं. आता सर्व ईच्छा संपल्याच आहेत. फक्त पुन्हा व्यवस्थित बरा होऊ दे एवढीच ईच्छा आहे. माझ्या अपघातानंतर आमचे पथक दहीहंडीत कधीच भाग घेत नाही. मी इतक्या प्रचंड वेगाने खाली आलो होतो की, पडल्यानंतर मला काय झालं ते कळलंच नाही.

तातडीने एका रिक्षातून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथे माझ्यावर उपचार करता येतील अशी काहीच व्यवस्था नव्हती. हळूहळू माझ्या पायाला मुंग्या यायला लागल्या होत्या. मी बेशुध्द झालो. त्या हॉस्पिटलमधून मला दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथे सिटी स्कॅन केलं आणि एमआरआय काढण्यात आला. तिथल्या डॉक्टरांनीही सांगितलं की, याला मोठ्या हॉस्पिटलला न्यावं लागेल.

शुध्दीवर आलो तेव्हा मी मुंबईच्या केइएम रुग्णालयात होतो. मला पुठ्ठ्यावर झोपवण्यात आलं होतं. कारण तिथे बेड उपलब्ध नव्हता. पहाटे चार वाजता मला बेड मिळाला. केईएममध्येच मला रक्ताची उलटीही झाली. खरं पाहिलं तर मला यातलं काहीच आठवत नाही. आईने मला हे सर्व नंतर सांगितलं. केईएमनंतर मी शुध्दीवर आलो तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होतो. ऑपरेशननंतर माझ्या नाका-तोंडात नळ्या टाकलेल्या होत्या.

पुढील दोन-अडीच वर्ष मला काहीच होश नव्हता. मला बोलतासुद्धा येत नव्हतं. तो सर्व काळ घर आणि हॉस्पिटल यातच गेला. 2012 साली मला थोडं फार कळायला लागलं. गर्दीत लोकांच्या अंगावर पडलो असतो तर मला फार दुखापत झाली नसती. पण काँक्रीटच्या रस्त्यावर जोरात पडल्याने माझ्या मणक्याला दुखापत झाली. त्यामुळे माझ्या छातीपासून शरीराचा खालचा सर्व भाग लुळा पडला. कंबर, पायात काहीच संवेदना नाहीत.

ऑपरेशननंतर सात महिने बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये होतो. खरंतर अपघातानंतर सहा महिने किंवा वर्षभरात बरा होईन, असं घरच्यांना आणि मित्रांना वाटलं होतं. पण गेली नऊ वर्षं मी बिछान्यावरच आहे. मला जागेवरून उठायचं असलं तरी मदत घ्यावी लागते. घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी एकट्या 75 वर्षांच्या माझ्या वडिलांवर आहे. त्यात माझ्या उपचारांचा खर्चदेखील त्यांच्यावरच आहे.

मला झालेल्या दुखापतीवर अजूनही पूर्ण उपचार निघालेला नाही. पण मी सध्या ‘ब्रेन आणि स्पाईन इन्स्टिट्यूट’च्या डॉ. नंदीनी गोकुलचंद्रन यांच्याकडे ‘स्टेम सेल्स’ द्वारा उपचार घेत आहे. या उपचाराने खूप फरक पडला.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी माझं ऑपरेशन केलं. “तू कधी चालू शकशील का हे सांगता येणार नाही,” असंही ते म्हणाले होते. अपघातानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. पडलो नसतो तर बरं झालं असतं, असं वाटतं. पण अपघात कधीही, कसाही होऊ शकतो.

दहीहंडीला राजकारणाचं स्वरूप
दहा वर्षांपूर्वी दहीहंडीला राजकारणाचं स्वरूप नव्हतं. पण गेल्या पाच-सात वर्षांत या सणाचा इव्हेंटच झाला आहे. कुणाची दहीहंडी मोठी यामध्ये स्पर्धा लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मुलं जखमी होतात. कुणाकुणाला तर जीवही गमवावा लागतो. बहुतांश दहीहंडी पथकांमध्ये सहभागी होणारे गोविंदा गरीब घरातील असतात.

कितीही काळजी घेतली तरी अपघात होतातच. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी सरकारी रूग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवायला पाहिजेत. तसं पत्र दहीहंडी मंडळांच्या समन्वय समितीने रुग्णालयांना द्यायला हवं. जेणेकरून जखमी गोविंदांवर ताबडतोब उपचार होऊ शकतील.

दहीहंडीत तरुणांनी काळजी घ्यावी
दहीहंडी हा सण सुरू राहायला हवा, असं मला वाटतं. पण यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मी एवढंच सांगेन की, “कमीत कमी थर लावून स्वत:ची काळजी घेऊन हा सण साजरा करा. सकाळी दहा ते रात्री दहा या बारा तासांसाठी आपला जीव गमावू नका. कमी थर लावा आणि कमी थरात जास्त आनंद साजरा करा.

महत्वाच्या बातम्या
Sangali: गणपती समोर सिनेमातील गाणी लाऊन डान्स करणे चुकीचे, ते बंद करा; कालिचरण महाराजांनी ठणकावले
नरेंद्र मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्त्व; फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा; ब्राह्मण महासंघाची मागणी
‘संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन, आणि मुख्यमंत्र्यांना…,’ आक्रमक युवासेनेने दिलं ओपेन चॅलेंज
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या    

आरोग्य Featured इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट लेख

Join WhatsApp

Join Now