सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत आपल्या संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा केली. यावरून आता विरोधक प्रतिक्रिया देत आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे विरोधक टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नमस्कार म्हटल्यावर किती दिवसांची शिक्षा होईल असा प्रतिप्रश्न करत त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रामध्ये माणसे एकमेकांना भेटल्यानंतर ‘नमस्कार’ असे म्हणून संभाषणाला सुरुवात करतात. टेलिफोनवर बोलताना ‘हॅलो’ हा शब्द सगळ्यांच्याच तोंडात असतो. गावाकडे जाता-येता कोणी दिसले कि आपल्या कानावर ‘राम राम’ हे शब्द पडतात.
तसेच म्हणाले, माझा प्रश्न असा आहे की, वंदे मातरम म्हणावेच लागेल, संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करावीच लागेल हा फतवा कशासाठी आहे? या फतव्यातून तुम्ही काय साधू इच्छिता. आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ते पारतंत्र्याच्या जोखाड्यातून मोकळा श्वास घेण्यासाठी मिळाले आहे.
स्वातंत्र्यानंतर आपण संविधान स्विकारले आणि त्या संविधानात भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असे दोन्ही हक्क अबाधित ठेवण्यात आले. हे हक्क हिरावून घेणारे तुम्ही कोण? जय हिंद म्हणायचे असेल मला तुमची परवानगी लागणार आहे का? ती देणार आहात का?
नमस्कार करुन कोणाला संभाषणाची सुरुवात करायची असेल तर तुम्हांला परवानगी मागावी लागेल का? त्यासाठी काही लायसन्स मिळणार आहे का? जोरजबरदस्तीचे राजकारण हे अशा पद्धतीने तुम्ही राबवू शकणार नाही. शब्दांमध्ये भावना असतात. भावनांमध्ये प्रेम असते, आदर असतो, असे आव्हाड म्हणाले.
संभाषणाची आणि संवादाची सुरुवात कशी करायची आणि त्याचा शेवट कसा करायचा हे प्रत्येक माणसाची भाषा बोलण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही काय म्हणायचे हे तुम्ही सांगू शकत नाही. तुमचे आम्ही ऐकणारही नाही. एवढेच सांगा की आता नमस्कार म्हटल्यावर किती दिवस जेलची शिक्षा तुम्ही देणार आहात, असा आव्हाड यांनी प्रश्न केला.