भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी यांनी भाषण केलं. त्यांनी सत्कार समारंभात उपस्थित नेत्यांचे कान टोचत तुफान फटकेबाजी केली.
नितीन गडकरी म्हणाले, आपला पक्ष हा आई मुलाचा पक्ष नाही. आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कार्यकर्त्याला सर्वात प्रथम प्राधान्य दिलं जातं. आपल्या पक्षातील आमदार खासदारांनी लक्षात ठेवा, आपल्या पोरा-पोरींसाठी तिकीटं मागू नका.
जर कोणत्या आमदार खासदाराने आपल्या पोरा-पोरींसाठी तिकीटं मागितली तर त्याला माझा ठाम विरोध असेन. तुम्ही तिकीटं मागता कामा नये. जनतेने तुमच्या मुलांसाठी तिकीटं मागितली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाले.
तसेच म्हणाले, माझ्या मुलाला एक संधी द्या, तिकीट द्या.. असं म्हणता कामा नये… मला नाही तर बायकोला तिकीट द्या.. मेव्हण्याला तिकीट द्या.. असले धंदे बंद.. बावनकुळे साहेब हे सगळं बंद करा… जर कुणी तसं तिकीट मागितलंत तर सर्वांत पहिला माझा विरोध असेन.
तुम्ही तुमच्या पोरांसाठी उमेदवारी मागता कामा नये. जनतेचं त्यांच्यावर एवढं प्रेम असावं की त्यांनीच तुमच्या पोरांसाठी उमेदवारी मागायला हवी, असे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उदाहरण भाजप नेत्यांपुढे ठेवलं.
म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांच्या नेतृत्वात मी काम करायचो. त्यांनी कधी नाही म्हटलं की त्याला राजकारणात घ्या. गंगाधरराव फडणवीस आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं की तुमची प्रकृती आता बरी नाही. तुमच्या जागी देवेंद्रला संधी द्या.
मात्र, त्यांनी सांगितलं माझी काही हरकत नाही. तुम्ही देवेंद्रशी बोला. मग देवेंद्र राजकारणात आले. वडिलांची पुण्याई आणि वारसा होताच. पण त्यांनी नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षाचा नेता, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ही पदं स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवलं. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असे गडकरी म्हणाले.