एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली, तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यातील वाद प्रतिवाद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच शिंदे गटातील आमदाराने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना धमकी दिली आहे.
हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना धमकी दिली आहे. म्हणाले, आमच्या नादी लागू नका, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका असे बांगर म्हणाले.
काल हिंगोलीत संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगरांचा ‘बाहुबली अवतार’ पाहायला मिळाला. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला.
एवढेच नाही तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क क्रेनने हार घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी झालेल्या सभेत संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषणे ठोकत ठाकरे गटावर हल्ला चढवला. कालच्या या सभेची सर्वत्र चर्चा झाली.
यावेळी संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर हल्लाबोल केला म्हणाले, आपल्याला डिवचण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे तोंडभरून कौतुक केले. म्हणाले, बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता, असे म्हणत त्यांनी गुपित सांगितलं.