पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज त्याच संजय राठोड यांना एकनाथ शिंदे गटातून मंत्रिपद दिल्यापासून विविध स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या आहेत.
नुकतेच भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील संजय राठोड यांना मंत्रिपद देणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. चित्रा वाघ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता भूमाता ब्रिगडच्या तृप्ती देसाई यांनी त्यांना चांगलच डिवचलं आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना जबाबदार धरून भाजपने पुढाकार घेत संजय राठोड यांचा राजीनामा मागितला होता. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.
मात्र आज त्याच संजय राठोड यांना मंत्री बनवलं आहे, पहिल्या रांगेत स्थान दिलं आहे तर चित्रा वाघ यांना आमंत्रण सुद्धा नव्हतं, म्हणाल्या, चित्रा ताई, तुम्हाला खरंच पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा असेल आणि खरोखरच संजय राठोडांना तुमचा विरोध असेल तर पदाचा राजीनामा द्या, असा सल्ला तृप्ती देसाई यांनी वाघ यांना दिला.
तसेच म्हणाल्या, राजीनामा दिला तरच सर्व सामान्यांना वाटेल की, तुम्ही संजय राठोडांच्या विरोधात आहेत. तुम्ही म्हणतात ना लढू आणि जिंकू तर तुम्ही लढा आणि जिंका पण भाजपमध्ये राहून ते शक्य होणार नाही. कारण तुमच्याच पार्टीने त्यांना मंत्रिपद दिले आहे.
तृप्ती देसाई यांनी एकही महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी दिली नाही यावरून देखील खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं की, माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे जितेंगे.