‘.. बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा’; ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

काल सकाळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला. काल सकाळपासून त्यांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर काल माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे गटावर आणि नवीन महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, जे काही आरोप करण्यात येत आहेत ते फक्त शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत.

तसेच म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. हे सगळं दमनचक्र सुरु आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला फटकारलं.

खरी शिवसेना काय आहे ते पाहता आहेत. माझ्या विरोधात खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार करण्यात येत आहेत. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र कमजोर होणार नाही, शिवसेना कमजोर नाही, संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले करण्यात येत आहेत, पेढे वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा, असं संजय राऊत यांनी माध्यमांसमोर मोठ मोठ्याने हल्लाबोल करत शिंदे गटावर निशाणा साधला.

त्यानंतर, संजय राऊत यांनी ट्विट केलं, त्यात लिहिले,’उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई सुरू आहे. कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले. आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते, जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र’