महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. सरकारमध्ये १६० पेक्षा अधिक आमदार असून देखील मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याची दखल घेत आता राज्यपालांना सवाल केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ १A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे.
तसेच पुढे लिहिले आहे की, १२ पेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले २ आठवडे महाराष्ट्रात २ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही राज्यपाल, हे काय सुरू आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
त्यानंतर, प्राध्यापक हरी नरके यांनी याच कलमाचा दाखला देत नियमावर ती बोट ठेवलं आहे आणि दोन मंत्र्याच्या कॅबिनेटवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. हे प्रकरण कोर्टात गेल्यास फडणवीस आणि शिंदेंना अडचणीत आणणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही
राज्यपाल,
हे काय सुरू आहे ? pic.twitter.com/SZtUpMzVjy— Sanjay Raut (@rautsanjay61) July 16, 2022
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी याविषयावर बोलताना प्रतिक्रिया दिली की, कॅबिनेटचा विस्तार हा लवकरच होईल, माझं आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं आहे. असे असले तरी, सध्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे आणि फडणवीसांवरती दबावही वाढताना दिसत आहे.
सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, म्हणून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे या घटना घडत असल्या तरी आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.