पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सासूने आपल्या मुलीला जेवायला दिलं नाही या रागात सुनेनं सासूचा थेट खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सून बाहेर गेली असताना सासूने घरी स्वयंपाकच केला नाही. त्यामुळे घरी असणारी नात उपाशी राहिली. जेव्हा घरी सून आली, तेव्हा आपली मुलगी उपाशी असल्याचं समजताच सासू सुनेत वाद झाला. यातूनच पुढे गुन्ह्याचा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा अशोक मुळे राहणार चाकण असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे तर सुवर्णा सागर मुळे ही आरोपी सून आहे. तिचं वय ३२ वर्षे आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्रीच्या वेळी घडली आहे. पोलिसांनी आरोपी सुनेला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा तपास केला तेव्हा समजले की या सासू सुनेत नेहमीच वाद व्हायचा. त्यातच मुलीला जेवण न देण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि सुनेनं नायलॉनच्या दोरीने सासूचा गळा आवळला. त्यामुळे सासू बेशुद्ध झाल्या.
त्यानंतर, आरोपी सुनेनं असं काही केलं पोलिसांनाही धक्का बसला. सासू खूप वेळ बेशुद्ध अवस्थेत पडली असताना, सुनेनं तिला तसंच पडू दिलं. काही वेळाने मुलगा घरी आल्यानंतर सासूला फीट येऊन पडल्या असं आरोपी सुनेनं सांगितलं. त्यानंतर मुलाने तातडीने आपल्या आईला रुग्णालयात नेलं.
मात्र, रुग्णालयात दाखल करताच सासूचा मृत्यू झाला. डॉक्टरांना आलेल्या शंकेमुळे त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली असता सूनेने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे चाकण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.