‘फक्त दोनच मुले जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही’- असदुद्दीन ओवैसी

देशात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी एक विभाग करीत आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही कायद्याला एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नकार दिला आहे.

वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एक विभाग कायदा करण्याची मागणी करत आहे. मात्र, दोनच मुले जन्माला घालण्याची मर्यादा ठरवणाऱ्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही असे असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केलं आहे. माहितीनुसार, भाजप नेते गिरिराज सिंह यांनीही लोकसंख्येबाबत कायदा करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं की, कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढल्याने अराजकता निर्माण होईल. यामुळे लोकसंख्येचा असमतोल व्हायला नको. यावर उत्तर देताना ओवैसी म्हणाले, त्यांचे आरोग्य मंत्री म्हणतात की, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याची गरज नाही. गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर करणारे मुस्लिम आहेत.

ओवैसी म्हणाले, आपण चीनसारखी चूक करायला नको. यातून देशाला फायदा होणार नाही. लोकसंख्या वाढीसाठी मुस्लिमांना जबाबदार धरू नका. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही कायद्याशिवाय प्रजनन दरात घट दिसून येते. भारताचा प्रजनन दर सातत्याने कमी होत आहे.

२०३० पर्यंत स्थिरता दिसेल. चीनची चूक आपण इथे पुन्हा करू नये, असे ओवैसी यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची चर्चा फार दिवसांपासून सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे.

मात्र, सरकारकडून या कायद्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही. ओडिसा, उत्तराखंड, तेलंगणा, महाराष्ट्र,आसाम, आंध्र प्रदेश  या राज्यांमध्येही एखाद्याला दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार नाही, असा नियम आहे.