एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं, आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झाले. या सगळ्या प्रकरणात शिवसेनेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर आता खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने हनुमान चालिसेचा विरोध केला होता. हनुमान चालिसेच्या प्रभावामुळेच शिवसेनेचे ४० आमदार शिवसेना सोडून गेले, त्यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
तसेच म्हणाल्या, महाविकास आघाडीचा त्याच दिवशी पराभव झाला ज्या दिवशी शिवसेनेचे ४० आमदार पक्ष सोडून गेले होते. मात्र, महाविकास आघाडीचे लोक आपला पराभव स्वीकारायला तयार नाहीत. आपले सरकार कोसळले यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
शिवसेनेला विश्वास होता की, आजही विधिमंळात बंड केलेले काही आमदार आमच्यासोबत आहेत. ते फुटणार आहेत. आज ते उपस्थित राहतील मात्र, मतदान करणार नाही, असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र याउलट झालं. हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच हा सर्व प्रकार घडला, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय उचलून धरल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे जाहीर केले होते.
यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले होते. तसेच शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. हनुमान चालिसेच्या वादानंतर राणा दाम्पत्यांना तुरुंगात जावे लागले होते. जवळपास दहा ते १२ दिवस त्यांना तुरुंगाची हवा खायला लागली होती. यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता.