एसआरए मधून कागदपत्रे चोरल्याचा आरोप असलेल्या प्रवीण कलमे यांना मुंबई पोलिसांनी अखेर अजामीनपात्र लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
एसआरएमधून फाईल चोरी केल्या प्रकरणी कलमे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय गृहखात्याने याविषयीचे पत्र पाठवत तपासाबाबत माहिती विचारली होती. ब्युरो ऑफ इम्मिग्रेशनने या २७ जून रोजी मुंबई पोलिसांना याविषयीची विचारणा केली होती.
त्यात मुंबई पोलिसांनी आज कलमेंविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस बजावल्याचे सांगितले. तसेच कलमे हे दुबईत लपून बसलेले असून पोलीस त्यांनी तिथून खेचून मुंबईत आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे हेच स्वतः कलमेला सरकारी फाईल चोरायला लावायचे, असा धक्कादायक आरोप केला आहे.
तसेच सोमय्या म्हणाले, सगळ्यांकडून वसुलीचे धंदे सुरू होते. मागील ६ महिन्यांपासून आम्ही कलमेविरोधात कारवाईची मागणी करत होतो. कलमे यांनी एसआरएमधील सरकारी फाईल चोरल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अटक करू नये यासाठी फोन देखील केले होते. शेवटी अंत जवळ आला आहे.
तसेच सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे, त्यांनी लिहिले आहे की, ‘कलमे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात तसेच शिवसेना नेते अनिल परब यांचा चाहता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा सचिन वाझे आहे’
प्रवीण कलमे नेमके आहेत कोण, तर प्रवीण कलमे हे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आहेत. अर्थ या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे यांना दिले आहेत.
प्रवीण कलमे हे गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल २०२१ मध्ये केला होता. त्यानंतर प्रवीण कलमे आणि अर्थ या सामजिक संस्थेने किरीट सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर शिवडी न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला होता. प्रवीण कलमे यांच्याविरोधात एसआरएने एप्रिलमध्ये एफआयआर दाखल केला होता. ते फरार असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती सोमय्या यांनी केली होती.